Kalamb Crime : कळंबमध्ये जुगारविरोधी मोठी कारवाई; ५९ जणांवर गुन्हे, २० लाखांचा मुद्देमाल जप्त!
अभय वार्ता/धाराशिव
जयनारायण दरक
धाराशिव जिल्ह्यात अवैध व्यवसायांविरोधात सुरू असलेल्या विशेष मोहिमेंतर्गत पोलीस प्रशासनाने मोठी आणि धडक कारवाई करत कळंब शहरातील एका जुगार अड्ड्यावर छापा टाकला.
कळंब शहरात क्लबच्या नावाखाली सुरू असलेल्या जुगाराच्या अड्ड्यावर पोलिसांनी बुधवारी रात्री धडक कारवाई करत जुगारबाजांचे धाबे दणाणले आहेत. कळंब-ढोकी रोडवरील हॉटेल हिमालय बार शेजारील संदीप कला, क्रीडा व सांस्कृतिक मंडळ येथे सुरू असलेल्या तीन पत्ती (तिरट) जुगारावर छापा टाकून तब्बल ५४ जणांना रंगेहात ताब्यात घेण्यात आले. क्लबच्या पाच संचालकांसह एकूण ५९ जणांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले असून, जवळपास २० लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
धाराशिव जिल्ह्यात अवैध व्यवसायांविरोधात सुरू असलेल्या विशेष मोहिमेअंतर्गत ही मोठी कारवाई करण्यात आली. जिल्ह्यातील जुगारविरोधातील आजवरच्या सर्वात मोठ्या कारवायांपैकी ही एक कारवाई मानली जात आहे.
पोलीस अधीक्षक रीतु खोखर, अपर पोलीस अधीक्षक सचिन पांडकर यांच्या मार्गदर्शनाखाली परिमंडळ पोलीस उपअधीक्षक अमोल मोहिते यांच्या विशेष पथकाने ही कारवाई केली.
क्लब नोंदणीच्या परवान्याचा गैरवापर करून मंडळाच्या आड जुगाराचा अड्डा चालविला जात असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली होती. माहितीची खातरजमा होताच पोलीस उपअधीक्षक अमोल मोहिते यांनी अत्यंत गुप्तपणे सापळा रचला. अचानक टाकलेल्या छाप्यामुळे जुगार खेळणाऱ्यांची एकच धावपळ उडाली; मात्र पोलिसांनी अड्ड्याला चारही बाजूंनी घेरत ५४ जणांना ताब्यात घेतले.
या कारवाईत जुगाराचे साहित्य, रोख रक्कम, मोबाईल फोन, चारचाकी व दुचाकी वाहने असा १९ लाख ९६ हजार ५० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. याप्रकरणी महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक अधिनियमांतर्गत कळंब पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
कारवाईत सहायक पोलीस निरीक्षक प्रवीण सोमवंशी, सुरेश कासुळे, पोलीस उपनिरीक्षक रामचंद्र बहुरे तसेच आरसीपी व क्यूआरटी पथकातील अधिकारी, अंमलदार आणि चालकांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली.
दरम्यान, जिल्ह्यात अवैध जुगार, मटका, हातभट्टी आणि अमली पदार्थांच्या व्यापाराविरोधात पोलीस प्रशासनाने विशेष मोहीम तीव्र केली आहे. कायद्याला आव्हान देणाऱ्या अवैध धंदेवाल्यांवर आता कोणतीही दया नाही; गोपनीय माहितीच्या आधारे धडक कारवाया सुरूच राहतील, असा स्पष्ट इशारा पोलीस प्रशासनाने दिला आहे.
========================================

Post a Comment
0 Comments