धाराशिवच्या राजकारणात मोठा भूकंप! शिंदे सेनेची संपूर्ण जिल्हा कार्यकारिणी बरखास्त; आता ओमराजे-तानाजीरावांच्या खांद्यावर नवी जबाबदारी!
अभय वार्ता/ धाराशिव
जयनारायण दरक
धाराशिव : जिल्ह्याच्या राजकारणात सध्या सर्वाधिक चर्चेचा विषय ठरलेली घडामोड म्हणजे खासदार ओमराजे निंबाळकर यांच्या शिंदे गटातील प्रवेशानंतर अवघ्या काही तासांत जिल्ह्यातील शिवसेना, युवासेना, महिला सेना आणि सर्व अंगीकृत संघटनांच्या कार्यकारिण्या बरखास्त करण्यात आल्या आहेत. या निर्णयामुळे जिल्ह्यातील राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली असून अनेक जुन्या पदाधिकाऱ्यांचे राजकीय भविष्य टांगणीला लागल्याची चर्चा रंगली आहे.
"जुन्यांना डावलणार की नव्यांना संधी?"
ओमराजे निंबाळकर यांच्या आगमनानंतर शिंदे सेनेला धाराशिवमध्ये नवे राजकीय बळ मिळाले असले तरी विद्यमान पदाधिकाऱ्यांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली होती. त्याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार संपूर्ण जिल्हा कार्यकारिणी बरखास्त करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे समोर आले आहे.
पक्ष नेतृत्वाकडून मात्र स्पष्ट संदेश देण्यात आला आहे की, "जुने आणि नवे पदाधिकारी यांचा समन्वय साधूनच नवी कार्यकारिणी जाहीर केली जाईल. कुणावरही अन्याय होणार नाही."
सर्व पदाधिकाऱ्यांची पदे आपोआप रद्द झाल्याने जिल्ह्यातील राजकीय समीकरणांना वेगळे वळण लागले आहे.
आता सर्वांची नजर ओमराजे-तानाजीरावांवर
नवीन संघटनात्मक बांधणीची सूत्रे आता खासदार ओमराजे निंबाळकर आणि माजी मंत्री प्रा. डॉ. तानाजीराव सावंत यांच्या हाती देण्यात येणार असल्याची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. आगामी जिल्हा परिषद, नगरपालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून संघटना मजबूत करण्याचा पक्षाचा प्रयत्न असल्याचे मानले जात आहे.
ठाकरे गटाला धक्का, शिंदे गटाची ताकद वाढली!
ओमराजे निंबाळकर यांच्या प्रवेशामुळे ठाकरे गटाला मोठा राजकीय धक्का बसल्याची चर्चा सुरू असून, शिंदे गटाने धाराशिव जिल्ह्यातील आगामी राजकीय लढाईसाठी कंबर कसल्याचे स्पष्ट दिसत आहे. त्यामुळे पुढील काही दिवसांत अनेक नवीन चेहरे राजकारणात पुढे येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
२८ जूनकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष
उद्धव ठाकरे यांच्या प्रस्तावित धाराशिव दौऱ्यापूर्वीच या घडामोडींनी राजकीय वातावरण तापवले आहे. नवी कार्यकारिणी कोणाची? कोणाला संधी? कोणाचा पत्ता कट? याची उत्सुकता आता शिगेला पोहोचली आहे.
जनतेचा आवाजचा सवाल...
धाराशिवच्या राजकारणात सुरू झालेला हा बदल केवळ संघटनात्मक आहे की आगामी निवडणुकांची रंगीत तालीम? ओमराजे-तानाजीरावांची जोडी जिल्ह्याचे राजकीय गणित बदलणार का?
याकडे आता संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे!
=========================================

Post a Comment
0 Comments