"बातमी आमच्याकडून… जाहिरात दुसरीकडून; मग सकारात्मक बातमीची अपेक्षा कशाच्या जोरावर?”
अभय वार्ता / धाराशिव
बातमी आमच्याकडून… जाहिरात दुसरीकडून; मग सकारात्मक बातमीची अपेक्षा कशाच्या जोरावर? दररोज रस्त्यावर वस्तुनिष्ठ बातमी प्रसारित करणारा
सामान्य पत्रकार हा लोकशाहीचा चौथा स्तंभ मानला जातो. एखाद्या नेत्याची भूमिका जनतेपर्यंत पोहोचवणे, विकासकामांची माहिती देणे, समस्या मांडणे आणि लोकांच्या प्रश्नांना वाचा फोडणे हे काम सामान्य (स्थानिक) पत्रकार सातत्याने करत असतो. मात्र दुर्दैवाची बाब म्हणजे अनेक राजकारण्यांची पत्रकारांबाबतची भूमिका केवळ सोयीनुसार बदलताना दिसते.
सकारात्मक बातमी हवी असेल, विरोधकांवर टीका प्रसिद्ध करून घ्यायची असेल किंवा स्वतःची भूमिका जनतेपर्यंत पोहोचवायची असेल, तेव्हा मात्र न विसरता सर्वात प्रथम सामान्य पत्रकारांची आठवण होते. बातमीत नाव राहिले तर लगेच फोन येतो. एखादी बातमी पसंत पडली नाही तरी पत्रकारांना जाब विचारला जातो.
परंतु जाहिरातीची वेळ आली की चित्र पूर्णपणे बदलते. “आर्थिक अडचण आहे”, “नंतर पाहू” खूप अडचणीत आहे, सध्या परिस्थिती नाही, वर्ष झाले एक काम नाही, बिल निघाले नाही अशी कारणे दिली जातात. त्याचवेळी शहरभर लाखो रुपयांची होर्डिंग्ज झळकतात आणि मोठ मोठ्या वृत्तपत्रांमध्ये पानभर जाहिराती दिल्या जातात. विडंबना अशी की, ज्या मोठ्या माध्यमांकडून याच कार्यकर्त्यांची साधी चौकटही प्रसिद्ध होत नाही, बातमीमध्ये त्यांचे नाव कधीच घेतले जात नाही. कधी बातमी घेतलीच तर अगदी कमी शब्दांत तेही थोडक्यात घेतली जाते. मात्र त्यांच्यावर जाहिरातीचा मोठा खर्च केला जातो; पण हाक मारल्याबरोबर एक फोन केला की रोज सोबत उभ्या राहणाऱ्या स्थानिक पत्रकारांकडे मात्र दुर्लक्ष केले जाते.
सामान्य पत्रकारांना कोणतेही मोठे आर्थिक पाठबळ नसते. जाहिराती हेच त्यांचे प्रमुख उत्पन्नाचे साधन असते. तरीही त्यांच्याकडून कायम सकारात्मक बातम्यांची अपेक्षा ठेवली जाते. मग प्रश्न असा पडतो की, ज्या पत्रकारांच्या माध्यमातून स्वतःची बाजू जनतेपर्यंत पोहोचवली जाते, त्यांनाच आर्थिकदृष्ट्या साथ देण्यास का कचरले जाते?
राजकारण्यांनी किमान जनाची नाही तर मनाची तरी बाळगावी. कारण सामान्य पत्रकारच जनतेचा आवाज तुमच्यापर्यंत आणि तुमचा आवाज जनतेपर्यंत पोहोचवत असतो. त्यामुळे स्थानिक पत्रकारांचा सन्मान आणि त्यांना जाहिरातीच्या माध्यमातून न्याय देणे ही केवळ जबाबदारीच आहे.
अभय वार्ता मुख्य संपादक जयनारायण दरक
8378 920 419
========================================
Post a Comment
0 Comments