रस्त्यांच्या कामातील निष्काळजीपणाने झालेल्या अपघातसंदर्भात ठेकेदारांसह अधिका-यांवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा - आमदार कैलास घाडगे-पाटील यांची एसपींकडे मागणी
अभय वार्ता / धाराशिव
जयनारायण दरक
धाराशिव शहरातील जिजाऊ चौक ते बोरफळ (राज्य मार्ग क्र. ६८) या रस्त्याच्या कामातील निष्काळजीपणामुळे झालेल्या अपघातात युवकाचा मृत्यू झाल्याने संबंधित ठेकेदार व अधिकाऱ्यांवर तात्काळ मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी आमदार कैलास घाडगे-पाटील यांनी पोलीस अधीक्षकांकडे केली आहे.
यासंदर्भात दिलेल्या निवेदनात त्यांनी म्हटले आहे की, सदर रस्त्याचे काम अनेक वर्षांपासून संथ गतीने सुरू असून, सुरक्षेच्या उपाययोजनांचा पूर्ण अभाव असल्याने वारंवार अपघात होत आहेत. ५ मे २०२६ रोजी रात्री सांजा गावाजवळ पुलाच्या कामाच्या ठिकाणी कोणतेही संरक्षण कठडे, इशारे किंवा रेडियम चिन्ह नसल्यामुळे भंडारवाडी येथील ओम दिलीप अंधारे या युवकाची दुचाकी पुलासाठी खणलेल्या खड्ड्यात जाऊन आदळली आणि त्याचा जागीच मृत्यू झाला. यापूर्वी दोन दिवसांपूर्वी याच ठिकाणी एका स्कॉर्पिओ वाहनाचा अपघात होऊन तीन ते चार जण गंभीर जखमी झाले होते. तरीही संबंधित ठेकेदार व अधिकाऱ्यांनी कोणतीही सुरक्षात्मक उपाययोजना केलेली नाही, असा आरोप करण्यात आला आहे. MSIDC मार्फत सुरू असलेल्या या कामासाठी कोणताही अधिकारी पूर्णवेळ नियुक्त नसून, देखरेखीअभावी कामाचा दर्जा व सुरक्षितता धोक्यात आली आहे. मराठवाड्यासाठी नियुक्त कार्यकारी अभियंत्यांनीही प्रत्यक्ष स्थळी उपस्थित राहून पाहणी केली नसल्याचा आरोप निवेदनात करण्यात आला आहे. या सर्व प्रकारामुळे संबंधित ठेकेदार व जबाबदार अधिकाऱ्यांच्या निष्काळजीपणामुळे निष्पाप नागरिकांचा बळी जात असल्याने त्यांच्यावर तात्काळ मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करून कठोर कारवाई करावी, अशी मागणी आमदार घाडगे-पाटील यांनी केली आहे.
========================================
.jpg)
Post a Comment
0 Comments