Type Here to Get Search Results !

विमाधारक शेतकऱ्यांसाठी खुश खबर - आमदार राणाजगजितसिंह पाटील

विमाधारक शेतकऱ्यांसाठी खुश खबर - आमदार राणाजगजितसिंह पाटील 





 अभय वार्ता / धाराशिव 


जयनारायण दरक 

खरीप २०२० मधील सोयाबीन पीक विमा प्रकरणात विमा कंपनीकडून सुरू असलेली तांत्रिक चालढकल आता थांबणार असून, मा. सर्वोच्च न्यायालयाने पुढील तारखेला या प्रकरणाची ‘अंतिम’ सुनावणी घेण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे मागील चार वर्षांपासून न्यायासाठी संघर्ष करणाऱ्या सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना लवकरच दिलासा मिळण्याची आशा निर्माण झाली आहे, अशी माहिती आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी दिली.


बुधवारी सर्वोच्च न्यायालयात झालेल्या सुनावणीदरम्यान विमा कंपनीने पुन्हा तांत्रिक मुद्द्यांचा आधार घेत उच्च न्यायालयात जमा असलेल्या ७५ कोटी रुपयांबाबत आक्षेप नोंदवित न्यायालयीन प्रक्रियेत गोंधळ निर्माण करण्याचा आणि खटला लांबणीवर टाकण्याचा प्रयत्न केला. मात्र, शेतकरी बांधवांच्या वतीने बाजू मांडणारे केंद्र सरकारचे ज्येष्ठ विधीज्ञ अ‍ॅड. बलबीर सिंग यांनी न्यायालयासमोर वास्तव परिस्थिती मांडत विमा कंपनीकडून सुरुवातीपासूनच जाणीवपूर्वक टाळाटाळ होत असल्याचे स्पष्ट केले. यावेळी अ‍ॅड. बलबीर सिंग यांनी अंतिम सुनावणीला लवकरात लवकर वेळ देण्याची मागणी केली. हा युक्तिवाद ग्राह्य धरत मा. सर्वोच्च न्यायालयाने उन्हाळी सुट्टीनंतर या प्रकरणाचा अंतिम निकाल लावण्यासाठी सुनावणी निश्चित करण्याचे स्पष्ट निर्देश दिले. खरीप २०२० आणि २०२१ च्या प्रलंबित विमा प्रकरणासंदर्भात आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी दिल्लीत उपस्थित राहून केंद्र सरकारचे ज्येष्ठ विधीज्ञ अ‍ॅड. बलबीर सिंग, अ‍ॅड. सुधांशू चौधरी, अ‍ॅड. शिंदे आणि लीगल टीमसोबत सविस्तर रणनीती आखली होती. या नियोजनाचा सकारात्मक परिणाम सुनावणीत दिसून आला असून, विमा कंपन्यांच्या आडमुठ्या भूमिकेविरोधात शेतकऱ्यांची बाजू अधिक मजबूत झाल्याचे बोलले जात आहे.


“विमा कंपन्यांनी कितीही तांत्रिक अडथळे निर्माण केले तरी शेतकऱ्यांच्या घामाचा पैसा मिळेपर्यंत आपण स्वस्थ बसणार नाही. उच्च न्यायालयाचा निकाल हा सत्याचा विजय असून सर्वोच्च न्यायालयातही शेतकऱ्यांचाच विजय होईल. ठाकरे सरकारच्या काळात या प्रश्नाकडे अक्षम्य दुर्लक्ष झाले, मात्र आपण हार मानली नाही. कनिष्ठ न्यायालयापासून सर्वोच्च न्यायालयापर्यंत हा लढा शेतकऱ्यांच्या मदतीने सुरू ठेवला. आता विमा कंपनीची कोणतीही युक्ती चालणार नाही,” असा विश्वास आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी व्यक्त केला. उन्हाळी सुट्टीनंतर होणारी अंतिम सुनावणी ही शेतकऱ्यांसाठी दिलासादायक ठरेल आणि प्रलंबित विमा रकमेचा मार्ग मोकळा होईल, अशी अपेक्षा शेतकरी वर्गातून व्यक्त होत आहे.

Post a Comment

0 Comments