Type Here to Get Search Results !

मंगरूळ हत्या प्रकरणाचा थरारक उलगडा; प्रेमसंबंधातून प्रियकराच्या मदतीने पतीचा केला खून पत्नीसह तिघे जेरबंद*

मंगरूळ हत्या प्रकरणाचा थरारक उलगडा; प्रेमसंबंधातून प्रियकराच्या मदतीने पतीचा केला खून पत्नीसह तिघे जेरबंद



मंगरूळ हत्या प्रकरणाचा थरारक उलगडा; प्रेमसंबंधातून कट रचत पत्नीने केला प्रियकराच्या मदतीने पतीचा खून तिघे जेरबंद


निर्दयी हत्येनंतर पुरावे लपवण्याचा प्रयत्न फसला; पोलिसांची भेदक कारवाई, आरोपींची कबुली!



  अभय वार्ता /  तुळजापूर  

जयनारायण दरक 

तुळजापूर तालुक्यातील मंगरूळ येथे 36 वर्षीय कृष्णा आनंद साठे यांच्या हत्येने सुरुवातीला गूढाचे आवरण चढवले होते; मात्र पोलिसांनी अत्यंत शिताफीने, कायद्याच्या चौकटीत राहून आणि तांत्रिक तसेच मानवी गुप्त माहितीचा अचूक संगम साधत या प्रकरणाचा थरारक उलगडा केला आहे. या हत्येमागे वैयक्तिक संबंधांचा गुंता, विश्वासघात आणि थंड डोक्याने आखलेला कट असल्याचे स्पष्ट झाले असून मयताची पत्नीच संशयाच्या केंद्रस्थानी आल्याने या प्रकरणाने अधिकच धक्कादायक वळण घेतले आहे.या तपासाला दिशा देताना पोलीस अधीक्षक रितू खोकर व उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. निलेश देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विनोद इज्जपवार, पोलीस निरीक्षक अण्णासाहेब मांजरे, स्थानिक गुन्हे शाखा सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल मोरे, पोलीस उपनिरीक्षक विजय थोटे तसेच पोलीस हवालदार महादेव राऊत व जी. बी. वागुलकर यांच्या संयुक्त पथकाने अत्यंत वेगवान आणि धारदार कारवाई करत तपासाची चक्रे फिरवली. घटनास्थळाचा बारकाईने पंचनामा, फॉरेन्सिक आणि श्वान पथकाचा वापर, सीसीटीव्ही फुटेजची छाननी आणि गोपनीय माहितीचा अचूक वापर करत पोलिसांनी गुन्ह्याची साखळी उलगडण्यास सुरुवात केली.घटनेचा घटनाक्रम समोर येताना या हत्येची क्रूरता अंगावर काटा आणणारी आहे. दिनांक 14 एप्रिल रोजी सायंकाळी सहा ते साडेसहा वाजण्याच्या सुमारास “गावात जाऊन येतो” असे सांगून घराबाहेर पडलेला कृष्णा साठे हा मुख्य आरोपी शुभम मल्लिकार्जुन घाटोळे याच्या जाळ्यात अडकला. मोटरसायकलवरून शेतात नेल्यानंतर आरोपीने थेट “तुझी पत्नी मला आवडते, तू आमच्यात अडथळा आहेस” असे सांगत निर्दयपणे लाकडाच्या ओंडक्याने डोक्यावर प्रहार केला. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या कृष्णाने जीव वाचवण्यासाठी आर्त विनंती केली, परंतु आरोपीच्या क्रौर्याने कोणतीही दया दाखवली नाही आणि काही क्षणांतच त्याचा जीव घेतला गेला.हत्या करूनही गुन्हा झाकण्यासाठी आरोपीने थंड डोक्याने पुढील डाव आखला. मृतदेह शेतातील बैलांच्या कोठ्यात लपवून ठेवण्यात आला, नंतर तो पोत्यात भरून एका परिचित टमटम चालकाला बोलावण्यात आले. मृतदेहाची वाहतूक करून मंगरूळ-तुळजापूर मार्गावरील पुलाजवळ आणण्यात आले आणि सुमारे 30 ते 40 मीटरपर्यंत फरपटत नेऊन टाकण्यात आले. या संपूर्ण कारवाईत गुन्ह्याचे पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न स्पष्ट दिसून येतो. टमटम चालकाला धमकावत “काही होणार नाही, गप्प बस” असे सांगून मौन पाळण्यास भाग पाडण्यात आले.या कटातील सर्वात धक्कादायक बाब म्हणजे, आरोपीने मयताच्या पत्नीला “काम ओके झाले” असा इशारा दिल्याचे तपासात उघड झाले आहे. यावरून ही हत्या अचानक घडलेली नसून पूर्वनियोजित आणि संगनमताने रचलेली असल्याचे स्पष्ट होते. पोलिसांनी सीसीटीव्ही, कॉल डिटेल्स, लोकेशन ट्रॅकिंग आणि स्थानिकांकडून मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे संशयितांचा घेरा आवळला.कसून चौकशीदरम्यान मयताची पत्नी प्रतिभा कृष्णा साठे, मुख्य आरोपी शुभम मल्लिकार्जुन घाटोळे आणि पार्थ देशमुख या तिघांनी गुन्ह्याची कबुली दिल्याची माहिती समोर आली आहे. या तिघांना ताब्यात घेण्यात आले असून पोलिसांकडून पुढील तपास अधिक तीव्र करण्यात आला आहे. या कारवाईतून पोलिसांची तपासातील धार, समन्वय आणि तांत्रिक कौशल्य स्पष्टपणे अधोरेखित झाले आहे.मंगरूळसह संपूर्ण तुळजापूर तालुक्यात या घटनेने खळबळ उडवली असून गावागावात चर्चांना उधाण आले आहे. विविध तर्कवितर्कांना उधाण आले असले तरी पोलिसांनी नागरिकांना अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन केले आहे. कायद्याच्या चौकटीत राहून दोषींना कठोर शिक्षा मिळवून देण्याचा निर्धार पोलीस यंत्रणेने व्यक्त केला आहे.या प्रकरणात पोलिसांनी दाखवलेली तत्परता आणि निर्णायक कारवाई ही गुन्हेगारांसाठी स्पष्ट इशारा आहे—कितीही चलाखीने गुन्हा केला तरी कायद्याच्या कचाट्यातून सुटका नाही. मंगरूळ हत्या प्रकरण आता उलगड्याच्या अंतिम टप्प्यात असून येत्या काळात आणखी धक्कादायक तपशील समोर येण्याची शक्यता नाकारता येत नाही.



पोलिसांची चौकशी पद्धत ठरली निर्णायक…

आरोपींनी उघडली गुन्ह्याची कबुलीसदर प्रकरणाच्या तपासात स्थानिक गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल मोरे, पोलीस हवालदार बळीराम शिंदे व पोलीस हवालदार अमोल निंबाळकर यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. संशयितांची कसून चौकशी करत, पुराव्यांच्या आधारे घट्ट प्रश्नमंजुषा उभी करण्यात आली. पोलिसांनी कायद्याच्या चौकटीत राहून आरोपींना प्रभावीपणे जेरबंद करताच त्यांनी अखेर गुन्ह्याची कबुली देत संपूर्ण कट उघड केला. या कारवाईमुळे तपासाला निर्णायक वळण मिळाले असून पोलिसांच्या तपासकौशल्याची पुन्हा एकदा प्रचिती आली आहे.

========================================





Post a Comment

0 Comments