Type Here to Get Search Results !

धाराशिव जिल्हा परिषदेच्या सभापती निवडीत अनेकांना धक्के ! कळंब तालुक्याला दुहेरी संधी !!

धाराशिव जिल्हा परिषदेच्या सभापती निवडीत अनेकांना धक्के ! कळंब तालुक्याला दुहेरी संधी !!





 अभय वार्ता धाराशिव 

जयनारायण दरक 



धाराशिव जिल्हा परिषदेच्या सभापती पदाच्या निवडीत यंदा अनेक दिग्गजांना धक्का बसला असून, अनपेक्षित उमेदवारांना संधी मिळाल्याचे चित्र पाहायला मिळाले. विशेष म्हणजे, कळंब तालुक्यातील दोन जिल्हा परिषद सदस्यांना सभापती पदाची संधी मिळाल्याने तालुक्यात समाधानाचे वातावरण आहे.



या बाबत सविस्तर वृत्त असे की, आज पार पडलेल्या जिल्हा परिषदेच्या सभापती निवड प्रक्रियेत विविध राजकीय समीकरणांना छेद देत काही नव्या चेहऱ्यांना संधी देण्यात आली. शिवसेनेच्या शिंदे गटाकडून डिकसळ गटाच्या जिल्हा परिषद सदस्या सौ. पुजाताई तुषार शिंदे यांची महिला व बालकल्याण सभापतीपदी निवड करण्यात आली. त्यांच्या निवडीमुळे कळंब तालुक्यात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. त्याबरोबरच कळंब तालुक्यातील खामसवाडी गटाचे भाजपाचे जिल्हा परिषद सदस्य विश्वास कोकणे यांची समाजकल्याण सभापतीपदी वर्णी लागली. एका तालुक्यातील दोन सदस्यांना एकाच वेळी सभापती पदाची संधी मिळाल्याने हा कळंब तालुक्यासाठी ‘लॉटरी’ ठरल्याची चर्चा रंगली आहे. तुळजापूर विधानसभा मतदारसंघातील भाजपाचे सिद्धेश्वर कोरे यांची अर्थ व बांधकाम सभापतीपदी निवड झाली आहे. तसेच भूम-परंडा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) चे जिल्हा परिषद सदस्य भाऊसाहेब खरसडे यांची कृषी व पशुसंवर्धन सभापतीपदी निवड करण्यात आली.



सर्व नवनिर्वाचित सभापतींना प्रत्येकी ४५ मते मिळाल्याची माहिती समोर आली आहे. या निवडीत अपेक्षित नावांना संधी न मिळाल्याने अनेक राजकीय वर्तुळांमध्ये आश्चर्य व्यक्त होत आहे. नवनिर्वाचित सभापतींचे विविध लोकप्रतिनिधी, पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी अभिनंदन करून त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत. जिल्हा परिषद प्रशासनात नव्या नेतृत्वामुळे विकासकामांना गती मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.


--------------------------------------------------------------------------









Post a Comment

0 Comments