Type Here to Get Search Results !

चोराखळी कालिका कलाकेंद्रांवर सशस्त्र दरोडा:: पिस्तूल–सुरे दाखवून ९.५१ लाखांचा मुद्देमाल लंपास

चोराखळी कालिका कलाकेंद्रांवर सशस्त्र दरोडा:: पिस्तूल–सुरे दाखवून ९.५१ लाखांचा मुद्देमाल लंपास





अभय वार्ता वृत्तसेवा /धाराशिव 

जयनारायण दरक 


चोराखळी येथील,कालिका सांस्कृतिक कलाकेंद्र चालकाच्या घरी सहा जणांनी घुसखोरी करून पिस्तूल व लोखंडी सुरा दाखवत तब्बल ९लाख ५१ हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास केल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.या प्रकरणी येरमाळा पोलीस स्टेशन येथे तक्रार दाखल करण्यात आली आहे.



चोराखळी (ता. कळंब) येथील रहिवासी व कालिका सांस्कृतिक लोकनाट्य कलाकेंद्राच्या संचालिका निर्मला मोहन जाधव (वय ४५) या चोराखळी येथे धाराशिव साखर कारखान्याजवळ राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५२ लगत असलेल्या त्यांच्या कलाकेंद्राच्या दुसऱ्या मजल्यावर कुटुंबासह वास्तव्यास आहेत. त्यांच्यासोबत लहानपणापासूनची मैत्रीण रेखा किशोर शिंदे (रा. टाकळी, जि. परभणी) व शिवम उर्फ गळ्या गंगावणे हेही राहत होते.



तक्रारीनुसार, मागील काही महिन्यांपासून तेरखेडा येथील सचिन उर्फ प्रशांत बापू पवार व महादेव विठ्ठल घुले यांचा कलाकेंद्रावर ये–जा होता. आर्थिक व्यवहारातून वाद निर्माण झाल्यानंतर सचिन पवार याने घरफोडीची धमकी दिल्याचेही तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. दरम्यान जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाने चोराखळीतील कलाकेंद्र सील झाल्यानंतर निर्मला जाधव यांनी बार्शी (जि. सोलापूर) येथे भाड्याने दुसरे कलाकेंद्र सुरू केले होते. रविवारी ता. २ पहाटे नेहमीप्रमाणे बार्शी येथील कलाकेंद्र बंद करून पहाटे साडेतीनच्या सुमारास निर्मला जाधव, रेखा शिंदे, शिवम उर्फ गळ्या व चालक शशिकांत मुंडे हे इनोव्हा गाडीने चोराखळी येथे परतत असताना एका चारचाकी वाहनाने पाठलाग केल्याचे जाणवले. पहाटे साडेपाचच्या सुमारास घराचे दार उघडे असतानाच तोंडाला अर्धवट कापड बांधलेले सहा इसम घरात शिरले.



त्यापैकी दोघांनी शिवम गंगावणे याला जमिनीवर दाबून धरले, एकाने निर्मला जाधव यांच्या डोक्याला पिस्तूल लावले, तर दुसऱ्याने रेखा शिंदे यांच्या गळ्याला लोखंडी सुरा लावला. आरडाओरड केल्याने आरोपींनी तिघांच्या डोळ्यांत चटणी टाकून जीवे मारण्याची धमकी दिली.



यानंतर आरोपींनी निर्मला जाधव यांच्या अंगावरील सुमारे १२१.६०० ग्रॅम वजनाचे अंदाजे ६ लाख रुपये किमतीचे सोन्याचे दागिने, चार मोबाईल फोन (किंमत सुमारे ३ लाख ४९ हजार रुपये) तसेच सीसीटीव्ही डीव्हीआर असा एकूण ९ लाख ५१ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला.



दरोड्यावेळी समोर उभा असलेला एक आरोपी सचिन उर्फ प्रशांत पवार असल्याचे ओळखूनही जीवाला धोका असल्याने त्यांनी तात्काळ ओळख उघड केली नाही,असे तक्रारीत नमूद आहे. या दरोड्यात सचिन पवारसह पाच अज्ञात आरोपींचा तसेच महादेव घुले याचा सहभाग असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला असून येरमाळा पोलिस पुढील तपास करीत आहेत.

------------------------------------------------------------------------








Post a Comment

0 Comments