Type Here to Get Search Results !

स्मार्ट मीटरच्या गोंधळावर तोडगा; वीजबिल दुरुस्ती व हप्त्यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मान्यता

स्मार्ट मीटरच्या गोंधळावर तोडगा; वीजबिल दुरुस्ती व हप्त्यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मान्यता




अभय वार्ता वृत्तसेवा /धाराशिव 

जयनारायण दरक 


स्मार्ट मीटर बसवल्यानंतर वीज विभागाच्या यंत्रणेकडून झालेल्या तांत्रिक त्रुटींमुळे अनेक ग्राहकांना अव्वाच्या सव्वा बिलांचा फटका बसला असून, हजारो वीज कनेक्शन खंडित झाल्याची गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर संबंधित बिलांची दुरुस्ती करून रक्कम हप्त्यांमध्ये वसूल करावी, अशी मागणी आमदार कैलास पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली होती. मुख्यमंत्रीांनी ही मागणी मान्य केल्याने नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे.


आमदार पाटील यांनी सांगितले की,सध्या दहावीच्या परीक्षा सुरू असताना अनेक ठिकाणी वीजपुरवठा खंडित करण्यात आला आहे.काही ठिकाणी तांत्रिक अडचणींमुळे वीजपुरवठा बंद झाला असून जिल्ह्यात चार हजारांहून अधिक कनेक्शन बंद करण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली. ग्रामीण भागात जुने मीटर व्यवस्थित असतानाही नवीन स्मार्ट मीटर बसवण्यात आले. यामुळे पूर्वी नोव्हेंबरमध्ये सुमारे ७०० रुपये व डिसेंबरमध्ये ८०० रुपये येणारे बिल जानेवारीत थेट १५ हजारांच्या घरात पोहोचल्याच्या तक्रारी पुढे आल्या आहेत.


या वाढीव बिलांमध्ये तातडीने दुरुस्ती करून ग्राहकांना एकरकमी भरणा करण्याऐवजी हप्त्यांमध्ये बिल भरण्याची सुविधा द्यावी, अशी ठाम मागणी आमदार पाटील यांनी केली होती.


मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही मागणी मान्य करत, “हप्ते पाडून देण्यात अडचण नाही; मात्र बिल भरावेच लागेल,” असे स्पष्ट केले. तसेच वीजदरात कपात करण्यात आली असून स्मार्ट मीटर बसवणाऱ्या ग्राहकांना १० टक्के सवलत देण्यात आल्याची माहितीही त्यांनी दिली.

मुख्यमंत्र्यांच्या या निर्णयामुळे धाराशिव जिल्ह्यातील नागरिकांना दिलासा मिळाला असून, वीज विभागाने तातडीने बिल दुरुस्ती व हप्ते प्रक्रियेची अंमलबजावणी करावी, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

--------------------------------------------------------------------




Post a Comment

0 Comments