Type Here to Get Search Results !

महिला दिन : संघर्ष, सन्मान आणि समतेचा प्रवास

महिला दिन : संघर्ष, सन्मान आणि समतेचा प्रवास





समाजाच्या प्रगतीचा इतिहास पाहिला तर त्यामध्ये स्त्रीचे योगदान अत्यंत महत्त्वाचे दिसून येते. आई, बहीण, पत्नी, शिक्षिका, अधिकारी, वैज्ञानिक, खेळाडू अशा अनेक भूमिका पार पाडताना स्त्री समाजाला दिशा देत असते. तिच्या कर्तृत्वाचा सन्मान करण्यासाठी, तिच्या हक्कांबद्दल जागृती निर्माण करण्यासाठी आणि स्त्री-पुरुष समानतेचा संदेश देण्यासाठी दरवर्षी ८ मार्च हा दिवस जगभरात आंतरराष्ट्रीय महिला दिन म्हणून साजरा केला जातो.


महिला दिनाची सुरुवात ही अचानक झालेली नाही. त्यामागे महिलांच्या हक्कांसाठी झालेल्या दीर्घ संघर्षाचा इतिहास आहे. विसाव्या शतकाच्या सुरुवातीला अनेक देशांमध्ये महिलांना पुरुषांप्रमाणे समान अधिकार मिळत नव्हते. त्यांना मतदानाचा अधिकार नव्हता, कामाच्या ठिकाणी समान वेतन मिळत नव्हते आणि कामाचे तासही खूप जास्त असत. या अन्यायाविरुद्ध महिलांनी संघटितपणे आवाज उठवण्यास सुरुवात केली. सन १९०८ मध्ये अमेरिकेतील न्यूयॉर्क शहरात हजारो महिला कामगारांनी रस्त्यावर उतरून चांगल्या कामाच्या अटी, कमी कामाचे तास आणि मतदानाचा अधिकार मिळावा अशी मागणी केली. या आंदोलनामुळे महिलांच्या हक्कांच्या चळवळीला मोठी चालना मिळाली.


या पार्श्वभूमीवर १९१० मध्ये डेन्मार्कमधील कोपनहेगन येथे आंतरराष्ट्रीय समाजवादी महिला परिषद आयोजित करण्यात आली. या परिषदेत जर्मनीतील समाजकार्यकर्त्या क्लारा झेटकीन यांनी जगभरातील महिलांच्या हक्कांसाठी एक विशेष दिवस साजरा करण्याचा प्रस्ताव मांडला. परिषदेत सहभागी झालेल्या विविध देशांतील महिलांनी हा प्रस्ताव एकमताने स्वीकारला. त्यानंतर १९११ मध्ये ऑस्ट्रिया, डेन्मार्क, जर्मनी आणि स्वित्झर्लंड या देशांमध्ये प्रथमच मोठ्या प्रमाणावर महिला दिन साजरा करण्यात आला. पुढे हा विचार हळूहळू जगभर पसरत गेला. अखेरीस १९७५ मध्ये युनायटेड nation या आंतरराष्ट्रीय संस्थेने ८ मार्च हा दिवस अधिकृतपणे आंतरराष्ट्रीय महिला दिन म्हणून मान्यता दिली आणि तेव्हापासून हा दिवस जगभर साजरा केला जात आहे.


महिला दिनाच्या निमित्ताने शाळा, महाविद्यालये, सामाजिक संस्था आणि विविध कार्यालयांमध्ये अनेक उपक्रम राबवले जातात. महिलांच्या कर्तृत्वाचा गौरव करणारे कार्यक्रम, आरोग्य शिबिरे, व्याख्याने, चर्चासत्रे, सांस्कृतिक कार्यक्रम तसेच महिलांच्या सक्षमीकरणाबद्दल जागृती निर्माण करणारे उपक्रम आयोजित केले जातात. या माध्यमातून समाजात स्त्री-पुरुष समानतेचा विचार रुजवण्याचा प्रयत्न केला जातो.


भारतीय इतिहासातही अनेक महान स्त्रियांनी आपल्या कार्याने समाजाला दिशा दिली आहे. स्वराज्याच्या पायाभरणीत महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या राजमाता जिजाऊ यांनी छत्रपती शिवाजी महाराजांना धैर्य, स्वाभिमान आणि न्यायाचे संस्कार दिले. मुलींच्या शिक्षणाची पहिली ज्योत पेटवणाऱ्या क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांनी समाजातील अज्ञान आणि अन्यायाविरुद्ध लढा दिला. न्यायप्रिय आणि दूरदर्शी राज्यकर्त्या म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांनी आपल्या राज्यकारभारातून आदर्श प्रशासन घडवले आणि समाजासाठी अनेक लोकोपयोगी कामे केली. स्वातंत्र्यलढ्यात शौर्याचे अद्वितीय उदाहरण ठरलेल्या झाशीची राणी लक्ष्मीबाई यांनी देशासाठी पराक्रम गाजवला. अत्यंत कठीण परिस्थितीतही डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्याला खंबीर साथ देणाऱ्या माता रमाई (रमाबाई आंबेडकर) यांच्या त्याग, संयम आणि सहनशीलतेमुळे सामाजिक परिवर्तनाच्या महान कार्याला बळ मिळाले. तसेच वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या भारतातील पहिल्या महिलांपैकी एक असलेल्या आनंदीबाई जोशी यांनी प्रतिकूल परिस्थितीतही शिक्षण घेऊन समाजासाठी प्रेरणादायी उदाहरण निर्माण केले.


आजच्या आधुनिक काळातही अनेक महिलांनी विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कामगिरी करून समाजासाठी प्रेरणादायी उदाहरण निर्माण केले आहे. अवकाश क्षेत्रात भारताचे नाव जगभर पोहोचवणाऱ्या कल्पना चावला यांनी आपल्या जिद्दीने अनेक तरुणांना स्वप्ने पाहण्याची प्रेरणा दिली. क्रीडा क्षेत्रात कठोर परिश्रम आणि चिकाटीच्या जोरावर देशाला गौरव मिळवून देणाऱ्या मेरी कोम आणि पी. व्ही. सिंधू या आजच्या पिढीसाठी प्रेरणास्थान ठरल्या आहेत. सामाजिक कार्य आणि शिक्षण क्षेत्रात महत्त्वपूर्ण योगदान देणाऱ्या सुधा मूर्ती यांनी समाजसेवेचा आदर्श घालून दिला. प्रशासन क्षेत्रात धाडसी आणि प्रामाणिक कार्य करणाऱ्या किरण बेदी यांनी महिलांची क्षमता सिद्ध करून दाखवली.


आजच्या काळात देशाचे सर्वोच्च नेतृत्व करणाऱ्या द्रौपदी मुर्मू यांचाही प्रवास अत्यंत प्रेरणादायी आहे. साध्या कुटुंबातून पुढे येत शिक्षक म्हणून आपल्या कार्याची सुरुवात करणाऱ्या त्यांनी पुढे राजकारणात उल्लेखनीय कामगिरी केली आणि देशाच्या राष्ट्रपतीपदापर्यंतचा मानाचा प्रवास पूर्ण केला. त्यांच्या कार्यातून हे स्पष्ट होते की जिद्द, मेहनत आणि प्रामाणिकपणा यांच्या जोरावर स्त्री कोणत्याही उंचीवर पोहोचू शकते.


तरीही वास्तव पाहिले तर समाजातील अनेक महिलांना अजूनही अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. विशेषतः घटस्फोटित महिला, विधवा महिला किंवा एकट्याने मुलांना सांभाळणाऱ्या महिलांचे आयुष्य अनेकदा अधिक संघर्षमय असते. अशा महिलांकडे समाजाने सहानुभूतीपेक्षा आदराने आणि समजुतीने पाहणे गरजेचे आहे. प्रत्येक महिलेला स्वाभिमानाने आणि आत्मविश्वासाने जगण्याचा अधिकार आहे.


महिला दिन साजरा करताना केवळ शुभेच्छा देणे किंवा कार्यक्रम घेणे पुरेसे नाही. महिलांचा खरा सन्मान तेव्हाच होतो जेव्हा त्यांना शिक्षणाची समान संधी, सुरक्षित वातावरण आणि निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य दिले जाते. घरात, कार्यक्षेत्रात आणि समाजात महिलांना आदराने वागवणे ही प्रत्येकाची जबाबदारी आहे.


महिला दिन आपल्याला एक महत्त्वाचा संदेश देतो — समाजाची प्रगती स्त्री आणि पुरुष या दोघांच्या समान सहभागातूनच शक्य आहे. महिलांचा सन्मान, त्यांचे हक्क आणि त्यांचे स्वातंत्र्य जपले गेले तरच समाज खऱ्या अर्थाने प्रगत होऊ शकतो. म्हणूनच महिला दिन हा केवळ उत्सवाचा दिवस नसून समता, सन्मान आणि जागृतीचा संदेश देणारा महत्त्वपूर्ण दिवस आहे.


श्रीम.बालिका प्रभाकर गाडेकर

विद्याभवन हायस्कूल, कळंब

Post a Comment

0 Comments