वाशी तालुक्यातील दसमेगाव सोबत कळंब तालुक्यातील कन्हेरवाडीतील अफूची शेती करणारा शेतकरी गजाआड
अभय वार्ता वृत्तसेवा /धाराशिव
जयनारायण दरक
जिल्ह्यातील दुसरा मोठा प्रकार; 100 किलो अफू सापडल्याने कळंब तालुक्यात खळबळ,
धाराशिव जिल्ह्यात अफूच्या अवैध शेतीचे प्रकार वाढत असल्याचे पुन्हा एकदा समोर आले आहे. वाशी तालुक्यातील दसमेगाव येथील प्रकार ताजा असतानाच कळंब तालुक्यातील कन्हेरवाडी येथेही अफूची शेती उघडकीस आली आहे. कन्हेरवाडी येथील विलास नवनाथ कवडे यांच्या शेतामधून तब्बल 100 किलो वजनाचे अफू पीक जप्त करण्यात आले असून त्याची अंदाजे किंमत 15 लाख रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.
कळंब पोलीसांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार, कन्हेरवाडी ते मांडवा रोडलगत गट क्रमांक 316 मधील शेतात अफूची झाडे लावण्यात आल्याची माहिती मिळाली होती. माहितीची खातरजमा करून जिल्हा पोलीस अधीक्षक रितू खोकर व अप्पर पोलीस अधीक्षक शफकत अमना यांच्या मार्गदर्शनाखाली कळंब उपविभागीय पोलीस अधिकारी संजय पवार व पोलीस निरीक्षक अजित चिंतले यांनी तातडीने पथक तयार करून घटनास्थळी धाड टाकली.
पाहणीदरम्यान संबंधित शेतामध्ये मोठ्या प्रमाणावर अफूची झाडे आढळून आली. सुमारे 100 किलो वजनाचे अफू पीक जप्त करण्यात आले असून प्रतिकिलो 15 हजार रुपये दराने त्याची किंमत सुमारे 15 लाख रुपये असल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
पोलिसांनी सदर कारवाई दोन शासकीय पंच नायब तहसीलदार, कृषी अधिकारी यांच्या उपस्थितीत करण्यात आली. संपूर्ण कारवाईची व्हिडिओग्राफी करण्यात आली.
पंचांच्या उपस्थितीत घटनास्थळी पंचनामा करून संपूर्ण कारवाईची नोंद घेतली व मुद्देमाल जप्त केला.
या कारवाईत पोलीस निरीक्षक अजित चिंतले, सहाय्यक पोलीस निरीक्षक पंढरीनाथ मगर, पोलीस उपनिरीक्षक ज्ञानेश्वर घाडगे तसेच इतर पोलीस कर्मचारी व होमगार्ड जवान सहभागी होते.
या प्रकरणी संबंधित व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून पुढील तपास कळंब पोलीस करत आहेत, अशी माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक पंढरीनाथ मगर यांनी दिली.
अवैध अंमली पदार्थांच्या निर्मूलनासाठी पोलिसांनी कठोर भूमिका घेतली असून तालुक्यातील शेतकऱ्यांनी कायद्याचे उल्लंघन करू नये, अन्यथा कठोर कारवाई केली जाईल, असा इशारा प्रशासनाकडून देण्यात आला आहे.
Post a Comment
0 Comments