अभय वार्ता वृत्तसेवा विशेष
६ डिसेंबर हा दिवस भारतातील सर्व घटकांसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. कारण या दिवशी भारतीय संविधानाचे शिल्पकार, विश्वरत्न, समाजक्रांतीचे प्रणेते, लाखो वंचितांना मानव म्हणून जगण्याचा हक्क मिळवून देणारे महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे महापरिनिर्वाण झाले. म्हणूनच हा दिवस “महापरिनिर्वाण दिन” म्हणून देशभर सर्वत्र पाळला जातो. शहरात, गावात, वाड्या-वस्त्यांवरही बाबासाहेबांच्या स्मृतीला अभिवादन करत लोक मोठ्या संख्येने कार्यालयांमध्ये, चौकांमध्ये, स्मारकांमध्ये एकत्र येतात.
बाबासाहेबांचं आयुष्य म्हणजे संघर्षाची अखंड परंपरा. दारिद्र्यातून, जातीच्या अंधाऱ्या छायेतून वर आलेला हा महामानव केवळ स्वतःसाठी नाही तर सर्व समाजासाठी लढला. शिक्षणाचं शस्त्र घेतलं आणि अन्यायाविरुद्ध रणशिंग फुंकलं. गरीब, शेतकरी, मजूर, स्त्रिया, दलित, आदिवासी अशा सर्व वंचित घटकांना न्याय, समता आणि प्रतिष्ठा मिळावी यासाठी त्यांनी आयुष्य घालवलं. त्यामुळेच महापरिनिर्वाण दिन हा फक्त स्मरणाचा दिवस नसून, त्यांच्या विचारांचा वारसा पुढे नेण्याचा संकल्प दिन आहे. आज गावागावात लोक सकाळपासून बाबासाहेबांचे फोटो, पुतळे साफसफाई करून फुले वाहतात. शाळांमध्ये मुलं निळे झेंडे घेऊन मिरवणुका काढतात. युवक मंडळं व्याख्यानमालेचं आयोजन करतात. समाजातील मोठी माणसं बाबासाहेबांचं योगदान सांगतात. संविधानाने दिलेल्या अधिकारांची जाणीव करून देतात. पण एवढ्यावरच समाधान न मानता, त्यांच्या विचारांचा अर्थ खऱ्या अर्थाने समजून घेणं आवश्यक आहे. डॉ. बाळासाहेब आंबेडकरांनी माणसाला माणूस म्हणून जगण्याचा अधिकार मिळवून दिला. ते नेहमी म्हणायचे शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा. आजही त्यांच्या या मंत्राची गरज तितकीच आहे. शिक्षणाशिवाय समाजाचा विकास होऊ शकत नाही. म्हणूनच ग्रामीण भागात मुलानं शाळेत नियमित जावे, मुलींनी शिक्षणात मागे राहू नये, शेतकऱ्यांनी नवनवीन तंत्रज्ञान समजून घ्यावे, युवकांनी स्पर्धा परीक्षांसाठी तयारी करावी. हे सर्व बाबासाहेबांच्या विचारातूनच आलेलं बळ आहे.
महापरिनिर्वाण दिन हा केवळ श्रद्धांजलीचा दिवस नाही. आपल्याला जातीपातीच्या भिंती तोडून बंधुभावानं राहण्याची आठवण हा दिवस करून देतो. संविधानाने दिलेले हक्क फक्त कागदावर न राहता ते प्रत्यक्ष आयुष्यात रूजावे यासाठी आपण प्रत्येकजण जागरूक राहणं गरजेचं आहे. गावकुसातील भांडणं, मतभेद, अन्याय, अंधश्रद्धा, भेदभाव यांना बाजूला सारून, समानतेचा विचार अंगीकारणं हाच खरा बाबासाहेबांना दिलेला अभिवादनाचा मार्ग आहे. आज शहरी भागापासून ते ग्रामीण भागापर्यंत बाबासाहेबांच्या विचारांचा प्रकाश पसरत आहे. पण हा प्रकाश कायम ठेवण्यासाठी आपल्याला प्रयत्न करावे लागतील. दारिद्र्य, बेरोजगारी, अशिक्षितपणा यांच्यावर मात करण्यासाठी एकत्र येणं महत्त्वाचं आहे. बाबासाहेबांनी स्वप्न पाहिलेला समतामूलक समाज निर्माण करण्याची जबाबदारी आपलीच आहे. समाजातील दुर्बल घटकांना हात देणं, शेतकऱ्यांच्या समस्या समजून घेणं, महिलांच्या सुरक्षेला आणि शिक्षणाला प्राधान्य देणं, आणि संविधानाचे मूल्य- न्याय, समता, स्वातंत्र्य, बंधुता यांचा अंगीकार करणं म्हणजेच महापरिनिर्वाण दिनाचं खरं पालन. शेवटी एवढंच म्हणावंसं वाटतं की, बाबासाहेबांचे विचार फक्त पुतळ्यांपुरते किंवा कार्यक्रमापुरते न ठेवल्यासच गाव, तालुका, जिल्हा आणि अख्खा देश बदलू शकतो. हे मात्र तितकेच खरे आहे. असे आम्हाला वाटते.

Post a Comment
0 Comments