Type Here to Get Search Results !

देवधानोरा येथे श्री. खंडेराया आजच्या (सटीच्या) यात्रेची धामधूम सुरू

देवधानोरा येथे श्री. खंडेराया आजच्या (सटीच्या) यात्रेची धामधूम सुरू

ग्रामदैवताच्या नगरीत भक्तिमय वातावरण; रांगोळी, रोषणाई, विविध पारंपरिक कार्यक्रमांची रेलचेल






अभय वार्ता वृत्तसेवा/ देवधानोरा 


जयनारायण दरक 


कळंब तालुक्यातील देवधानोरा ग्रामस्थांचे ग्रामदैवत व कुलदैवत असलेल्या श्री खंडेराया सटीच्या वार्षिक यात्रेला यंदा विशेष उत्साह लाभला असून, संपूर्ण गावात सध्या उत्सवाचे मंगल वातावरण निर्माण झाले आहे. आज पासून दि. २६ रोजी यात्रेचा मुख्य दिवस असून,भावीक भक्तांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढण्याची अपेक्षा आहे. ग्रामस्थ, देवस्थान समिती व युवक मंडळे मिळून तयारीत कोणतीही कसर न ठेवता उत्सवाची धग, भक्तीचा रंग आणि परंपरेचा वारसा उजाळविण्यास सज्ज झाले आहेत.



 पारंपरिक विधींनी रंगणार मुख्य दिवस

यात्रेच्या मुख्य दिवशी पहाटेपासूनच मंदिरात पूजा-अभिषेक, महाआरती, देवदर्शनासाठी रांगा,लागतात गाड्या ओढणे, लंगर तोडणे यांसारख्या पारंपरिक विधींचे आयोजन करण्यात आले आहे. 

खंडेराया भक्तांसाठी आकर्षण ठरणारे वाघ्या–मुरळी नृत्यदेखील वातावरण अधिक भक्तिमय करणार आहे. 

यासोबतच रंगारंग सांस्कृतिक कार्यक्रम, पारंपरिक नाटक,तसेच मनोरंजन कार्यक्रमांचीही मेजवानी भक्तांना उपलब्ध होणार आहे.



 गुरुवारी जंगी कुस्तीचा फड

यात्रेच्या दुसऱ्या दिवशी, गुरुवार दि. २७ रोजी पारंपरिक जंगी कुस्तीचा भव्य फड रंगणार असून, परिसरातील तसेच जिल्ह्यातील नामांकित पैलवान या अखाड्यात आपली ताकद आजमावणार आहेत. या फडासाठी ग्रामस्थांनी मोठा कुस्तीमैदान परिसर तयार करून व्यवस्था काटेकोर केली आहे.


 मंदिर परिसरात स्वच्छता आणि उजळून निघालेली रोषणाई

यात्रेच्या पार्श्वभूमीवर मंदिर परिसरात स्वच्छता अभियान राबवून परिसर स्वच्छ, सुरळीत व भक्तांसाठी सोयीस्कर करण्यात आला आहे.

 देवस्थान परिसर विद्युत रोषणाईने उजळून निघाला असून, मंदिराच्या गाभाऱ्यापासून ते प्रवेशद्वारापर्यंत सजावट, रांगोळ्या, ध्वज आणि मनोहर दिव्यांच्या सजावटीने वातावरण अधिकच पवित्र व मंगलमय झाले आहे.



 ग्रामस्थांत उत्साह, पाहुण्यांसाठी स्वागत व्यवस्था

ग्रामस्थांनी यात्रेतील पाहुण्यांसाठी पिण्याचे पाणी, बसण्याची व्यवस्था, वाहनतळ, सुरक्षा आदी सर्व सोयी उपलब्ध करून दिल्या आहेत. विविध सामाजिक संस्थांनीही यात्रेत स्वयंसेवक नियोजित करून सुव्यवस्था राखण्याची तयारी पूर्ण केली आहे.


देवधानोरा येथील श्री खंडेराया सटीची यात्रा नेहमीच तालुक्यातील प्रमुख धार्मिक सोहळा मानली जाते. यंदा विशेष उत्साह, भव्य रोषणाई, सुबक सजावट आणि पारंपरिक कार्यक्रमांमुळे यात्रा अधिक दिमाखदार आणि अविस्मरणीय ठरणार आहे.

=======================================







Post a Comment

0 Comments