अभय वार्ता वृत्तसेवा /कळंब
जयनारायण दरक
धाराशिव जिल्ह्यातील कळंब शहरात निवडणूक वातावरण तापले असून पैशांचे वाटप केल्याच्या संशयावरून भाजप आणि काँग्रेस उमेदवारांच्या समर्थकांमध्ये जोरदार हाणामारी झाल्याची गंभीर घटना घडली आहे. हा प्रकार प्रभाग क्रमांक ६ मध्ये घडला असून दोन्ही बाजूच्या कार्यकर्त्यांमध्ये जोरदार हाणामारी झाल्याने परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.
नेमकी घटना काय?
मिळालेल्या माहितीनुसार, भाजप उमेदवार सारिका वाघ यांच्या पती आणि डॉक्टर असलेले रमेश वाघ हे पैसे वाटत असल्याचा संशय काँग्रेस कार्यकर्त्यांना आला. यावेळी काँग्रेसच्या समर्थकांनी त्यांना रंगेहात पकडल्याचा दावा केला.
यानंतर दोन्ही गटांमध्ये वाद वाढत जाऊन परिस्थिती हाताबाहेर गेली आणि हाणामारीचा आकार घेतला.
परस्परविरोधी गंभीर आरोप
भाजपचा आरोप:
डॉ. रमेश वाघ यांनी दिलेल्या माहितीनुसार, काँग्रेस उमेदवार पांडुरंग कुंभार यांच्या मुलाने आणि कार्यकर्त्यांनी त्यांना जबर मारहाण केली.
काँग्रेसचा आरोप:
काँग्रेसचे उमेदवार पांडुरंग कुंभार यांच्या पुत्र राहुल कुंभार यांनी आरोप केला की, भाजपचे १० ते १५ कार्यकर्त्यांनी मिळून त्यांना बेदम मारहाण केली. या मारहाणीत राहुल कुंभार यांच्या पायाला गंभीर दुखापत झाल्याचे सांगण्यात आले असून त्यांनी पाय मोडल्याचा दावा केला आहे.
रात्री उशिरापर्यंत पोलिस ठाण्यात गर्दी
घटनेनंतर दोन्ही बाजूंचे समर्थक मोठ्या संख्येने कळंब पोलिस ठाण्यात जमले. दोन्ही गटांकडून परस्पराविरोधात तक्रारी देण्याचे काम सुरू असून पोलिसांत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
वातावरण तणावपूर्ण, पोलिसांकडून कडक बंदोबस्त
निवडणुकीच्या तोंडावर घडलेल्या या घटनेमुळे कळंब शहरात खळबळ उडाली असून पोलिस प्रशासनाने सतर्कता वाढवली आहे. पुढील संभाव्य वाद रोखण्यासाठी परिसरात अतिरिक्त पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
========================================


Post a Comment
0 Comments