शिवसैनिकांना कदापी वाऱ्यावर सोडणार नाही - आमदार कैलास घाडगे-पाटील यांचे ठाकरेंना वचन
अभय वार्ता/धाराशिव
धाराशिव जिल्ह्यातील शिवसैनिकांना कोणत्याही परिस्थितीत वाऱ्यावर सोडले जाणार नाही, तसेच पक्षासाठी प्रामाणिकपणे काम करणाऱ्या प्रत्येक शिवसैनिकाच्या पाठीशी आपण खंबीरपणे उभे राहू, अशी ग्वाही आमदार कैलास घाडगे-पाटील यांनी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना भर सभेत दिली.
धाराशिव येथे आयोजित जाहीर सभेत उद्धव ठाकरे यांनी जिल्ह्यातील शिवसैनिकांना मार्गदर्शन केले. शिवसेनेतील फूटीनंतर झालेल्या या सभेला जिल्हाभरातून मोठ्या संख्येने पदाधिकारी, कार्यकर्ते आणि शिवसैनिक उपस्थित होते. यावेळी पक्ष संघटना अधिक सक्षम करण्यासाठी गावागावात आणि कानाकोपऱ्यात पोहोचून निष्ठेने काम करण्याचे आवाहन उद्धव ठाकरे यांनी केले. पक्षासाठी प्रामाणिकपणे काम करणाऱ्या शिवसैनिकांवर अन्याय होऊ देणार नाही. प्रत्येक शिवसैनिकाने ताठ मानेने उभे राहून संघटना बळकट करण्यासाठी योगदान द्यावे, असे आवाहन त्यांनी केले. जिल्ह्यातील शिवसैनिकांमध्ये नवचैतन्य निर्माण करून आगामी काळात पक्ष अधिक मजबूत करण्याचा निर्धारही व्यक्त करण्यात आला.
यावेळी आमदार कैलास घाडगे-पाटील यांनी उद्धव ठाकरे यांना विश्वास देताना, "धाराशिव जिल्ह्यातील एकही शिवसैनिक वाऱ्यावर सोडला जाणार नाही. प्रत्येक निष्ठावान कार्यकर्त्याच्या पाठीशी आम्ही ठामपणे उभे राहू आणि पक्षवाढीसाठी पूर्ण ताकदीने काम करू," असे आश्वासन दिले. सभेला माजी मंत्री आदित्य ठाकरे, आमदार प्रवीण स्वामी, जिल्ह्यातील पदाधिकारी, विविध आघाड्यांचे पदाधिकारी, महिला कार्यकर्त्या तसेच मोठ्या संख्येने शिवसैनिक उपस्थित होते. सभेदरम्यान उपस्थितांनी घोषणाबाजी करत पक्षनिष्ठेचा पुनरुच्चार केला आणि आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पक्ष अधिक बळकट करण्याचा निर्धार व्यक्त केला.
========================================

Post a Comment
0 Comments