#धाराशिव #गोवर्धन वाडी येथील निवासस्थानी #ओमराजे यांच्या बैठकीनंतर कार्यकर्त्यांमध्ये नाराजी?; #शिंदे गटात #प्रवेश #जवळपास #निश्चितच
अभय वार्ता/धाराशिव
धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर यांच्या पुढील राजकीय भूमिकेकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले असताना आज त्यांच्या निवासस्थानी लोकसभा मतदारसंघातील कार्यकर्त्यांसोबत संवाद व तालुकानिहाय बैठका पार पडत आहेत. मात्र, या बैठकींनंतर काही कार्यकर्त्यांकडून व्यक्त होत असलेल्या प्रतिक्रिया सध्या राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरत आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, ज्या तालुक्यांच्या बैठका पूर्ण झाल्या आहेत त्या बैठकीतून बाहेर पडलेल्या काही कार्यकर्त्यांनी नाराजी व्यक्त केल्याचे समोर येत आहे. काही कार्यकर्त्यांचा दावा आहे की, खासदार ओमराजे निंबाळकर यांनी आपल्या भविष्यातील राजकीय भूमिकेबाबत संकेत दिले असून शिवसेना शिंदे गटात प्रवेश करण्याच्या चर्चांना त्यामुळे अधिक बळ मिळत आहे.
काही कार्यकर्त्यांनी अनौपचारिक चर्चेदरम्यान असा आरोप केला की, बैठकीत कार्यकर्त्यांची मते जाणून घेण्यापेक्षा स्वतःची भूमिका मांडण्यावर अधिक भर देण्यात आला. मात्र या दाव्यांबाबत कोणतीही अधिकृत पुष्टी झालेली नाही.
दरम्यान, बैठकीतील आणखी एक बाब चर्चेचा विषय ठरत आहे. आमदार कैलास पाटील, आमदार स्वामी साहेब तसेच जिल्हाप्रमुख रणजित पाटील हे बैठकीला उपस्थित नसल्याची चर्चा सोशल मीडियावर सुरू आहे. यावरून विविध तर्क-वितर्क लावले जात असले तरी संबंधित नेत्यांकडून कोणतीही अधिकृत भूमिका अद्याप समोर आलेली नाही.
सोशल मीडियावर काही पोस्ट मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून, त्यामध्ये बैठकीतील अनुपस्थितीचा संबंध आगामी राजकीय घडामोडींशी जोडण्याचा प्रयत्न केला जात आहे. मात्र या दाव्यांची स्वतंत्रपणे पुष्टी झालेली नाही.
खासदार ओमराजे निंबाळकर यांनी अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा केलेली नसली तरी त्यांच्या बैठका आणि सुरू असलेल्या चर्चांमुळे धाराशिवसह राज्याच्या राजकारणात उत्सुकता वाढली आहे. आता त्यांच्या अंतिम निर्णयाकडे कार्यकर्ते, पदाधिकारी आणि राजकीय निरीक्षकांचे लक्ष लागले आहे.
आगामी काही दिवसांत किंवा तासांत त्यांच्या राजकीय भवितव्याबाबत मोठी घोषणा होण्याची शक्यता व्यक्त केली जात असून, त्याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.
=======================================


Post a Comment
0 Comments