अभय वार्ता / धाराशिव
जयनारायण दरक
धाराशिव जिल्ह्यातील राजकारणात गेल्या काही दिवसांपासून मोठ्या राजकीय घडामोडींची चर्चा रंगू लागली आहे. विविध पक्षांतील संभाव्य फेरबदल आणि संघटनात्मक बदलांमुळे आता ठाकरे गटाच्या शिवसेनेची जिल्ह्यातील धुरा आमदार कैलास घाडगे-पाटील यांच्या खांद्यावर सोपविण्यात येण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
या बाबत सविस्तर वृत्त असे की, राजकीय वर्तुळात सुरू असलेल्या चर्चेनुसार, धाराशिव-कळंब विधानसभा मतदारसंघाचे सलग दोन वेळा प्रतिनिधित्व करणारे आमदार कैलास घाडगे-पाटील यांनी आपल्या कार्यशैलीमुळे आणि जनसंपर्काच्या बळावर जिल्ह्यात स्वतंत्र राजकीय ओळख निर्माण केली आहे. गावपातळीपासून जिल्हा परिषद आणि त्यानंतर विधानसभा असा त्यांचा राजकीय प्रवास राहिला असून, ग्रामीण तसेच शहरी भागात त्यांचे व्यापक संपर्क जाळे आहे. शिवसेनेच्या ठाकरे गटाकडून आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका, संघटन विस्तार आणि पक्षबांधणी यांना विशेष महत्त्व दिले जात आहे.
अशा परिस्थितीत जिल्ह्यात पक्षाला अधिक बळकटी देण्यासाठी सक्षम नेतृत्वाची गरज असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे जिल्ह्यातील पक्ष संघटनेची जबाबदारी आमदार घाडगे-पाटील यांच्याकडे सोपविण्याबाबत राजकीय जाणकारांकडून कयास व्यक्त केले जात आहेत.यासंदर्भात पक्षाच्या वरिष्ठ पातळीवर कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नसली तरी जिल्ह्यातील राजकीय घडामोडींना वेग आला असून, आगामी काळात याबाबत स्पष्ट चित्र समोर येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे धाराशिव जिल्ह्यातील राजकीय वातावरण आणखी तापण्याची चिन्हे दिसून येत आहेत.
========================================


Post a Comment
0 Comments