Type Here to Get Search Results !

लोकशाही प्रक्रियेत सहभाग वाढवण्यासाठी पदवीधर मतदारांनी जास्तीत जास्त नाव नोंदणी करावी - विभागीय आयुक्त जितेंद्र पापळकर

लोकशाही प्रक्रियेत सहभाग वाढवण्यासाठी पदवीधर मतदारांनी जास्तीत जास्त नाव नोंदणी करावी - विभागीय आयुक्त जितेंद्र पापळकर





अभय वार्ता वृत्तसेवा/ संभाजीनगर


लोकशाही प्रक्रियेत सक्रिय सहभाग दर्शवण्यासाठी औरंगाबाद पदवीधर मतदारसंघातील पदवीधर मतदारांनी मोठ्या संख्येने नाव नोंदणी करावी, असे आवाहन मतदार नोंदणी अधिकारी तथा विभागीय आयुक्त जितेंद्र पापळकर यांनी केले आहे.



या बाबत सविस्तर वृत्त असे की, भारत निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या कार्यक्रमानुसार औरंगाबाद विभाग पदवीधर मतदारसंघाची प्रारूप मतदार यादी दि. ३ डिसेंबर २०२५ रोजी प्रसिद्ध करण्यात आली आहे. या प्रारूप यादीवर ३ डिसेंबर ते १८ डिसेंबर २०२५ या कालावधीत दावे व हरकती दाखल करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. यासाठी मतदान केंद्रनिहाय पदनिर्दिष्ट अधिकारी नेमून त्यांना कार्यालयीन वेळेत संबंधित मतदान केंद्रावर उपस्थित राहून अर्ज स्वीकारण्याच्या स्पष्ट सूचना देण्यात आल्या आहेत.



दि. ६ नोव्हेंबर ते २ डिसेंबर २०२५ या कालावधीत ऑनलाईन व ऑफलाईन प्राप्त झालेल्या सर्व अर्जांची छाननी करून ते दावे-हरकतींच्या कालावधीत डाटाएन्ट्री प्रक्रियेत समाविष्ट करून निकाली काढले जाणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. महिला मतदारांच्या नावातील बदलासंदर्भातील अर्जांचे आवश्यक कागदपत्रांद्वारे परीक्षण तसेच आवश्यकतेनुसार गृहचौकशी करून नियमानुसार कार्यवाही करण्यात येणार आहे. प्रारूप मतदार यादीत आढळून आलेल्या त्रुटींची तात्काळ दुरुस्ती करण्याच्या सूचनाही सर्व सहाय्यक मतदार नोंदणी अधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत. मतदार नोंदणी ही निरंतर प्रक्रिया असून नामनिर्देशन दाखल करण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत चालू राहते. ऑनलाईन व ऑफलाईन दोन्ही माध्यमातून मतदार नोंदणीसाठी अर्ज स्वीकारले जाणार असून, कोणत्याही परिस्थितीत ऑफलाईन अर्ज स्वीकारण्यास नकार देऊ नये, असे आदेशही क्षेत्रीय पातळीवरील सहाय्यक मतदार नोंदणी अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत.

Post a Comment

0 Comments