अभय वार्ता वृत्तसेवा /धाराशिव
जयनारायण दरक
राज्य निवडणूक आयोगाने नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक - २०२५ कार्यक्रम जाहीर केला आहे.नगरपालिका व नगरपंचायत क्षेत्रात ४ नोव्हेंबरपासून आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे. निवडणूक प्रक्रिया शांततेत, निर्भय व न्याय्य वातावरणात पार पाडण्यासाठी निवडणूक काळात विविध प्रतिबंधात्मक आदेशाची प्रभावी अंमलबजावणी करावी,असे निर्देश जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी कीर्ती किरण पुजार यांनी दिले.
या संदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृह नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक-२०२५ च्या अनुषंगाने आयोजित कायदा व सुव्यवस्थेबाबतच्या बैठकीत जिल्हाधिकारी किर्ती पुजारी बोलत होते. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. मैनाक घोष, पोलीस अधीक्षक रितूताई खोखर,सहाय्यक जिल्हाधिकारी रवैयाह डोंगरे व नगरपालिका प्रशासनचे सहायक आयुक् .ढेंगळे यांची प्रमुख उपस्थिती होती.
पुढे बोलताना जिल्हाधिकारी म्हणाले की,निवडणूक काळात परवाना असलेली शस्त्रे जमा करून घ्यावी. निवडणूक काळात आदर्श आचारसंहितेचे काटेकोरपणे पालन करण्यात यावे. सुरक्षाविषयक बाबींचा आढावा नियमित घेण्यात यावा.मतदान केंद्राच्या १०० मीटर परिसराची आखणी करण्यात यावी.या परिसरात आवश्यक तो प्रतिबंध करण्यात यावा.मतदान केंद्राच्या २०० मीटर बाहेर उमेदवारांचे बुथ असले पाहिजे, याची दक्षता घ्यावी.संयुक्त भेटी देऊन कुठेही उणीव राहणार नाही याबाबत जबाबदारी घ्यावी.मतपेट्या ज्या ठिकाणी ठेवण्यात येणार आहे,त्या स्ट्रॉंग रूमला व परिसरात कडक पोलिस बंदोबस्त ठेवण्यात यावा.तसेच सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात यावे.मतदान केंद्र व मतमोजणी केंद्रावर कोणाला प्रवेश राहणार आहे,याची माहिती स्थानिक पातळीवर द्यावी.त्यामुळे संभ्रम राहणार नाही असे ते म्हणाले.
श्रीमती खोखर ताई म्हणाल्या की, निवडणूक काळात कायदा व सुव्यवस्था उत्तम राहावी.निवडणुकीच्या संदर्भाने तातडीने प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात यावी. दारू व पैशाचा वापर या काळात होणार नाही, याची दक्षता घ्यावी. गावठी पिस्तूल व तलवारीचा निवडणूक काळात कोणाकडूनही वापर होणार नाही, यासाठी धाडसत्र राबवून ते जप्ती कारवाई करण्यात यावी.निवडणुकीसाठी लागणाऱ्या पोलीस बंदोबस्तासाठी आवश्यक पोलीस मनुष्यबळाची मागणी करावी. सर्व पोलीस स्टेशनमध्ये आवश्यक ते शस्त्रास्त्रे व साहित्य उपलब्ध करून घ्यावे, ही निवडणूक निर्भय व शांत वातावरणात पार पाडावी,असे त्या म्हणाल्या.
या बैठकीस सर्व उपविभागीय महसूल अधिकारी, उपविभागीय पोलीस अधिकारी, तहसीलदार,नगरपरिषदा व नगरपंचायतचे मुख्याधिकारी उपस्थित होते.यावेळी संबधित अधिकाऱ्यांनी निवडणूकीच्या अनुषंगाने करण्यात येत असलेल्या कामांची माहिती दिली.
=======================================
.jpg)
.jpg)
Post a Comment
0 Comments