खामसवाडीत लांडग्याचा कहर; शेळीचा पाडला फडशा!खामसवाडी, मंगरूळ परिसरात भीतीचे वातावरण
अभय वार्ता वृत्तसेवा/कळंब
जयनारायण दरक
तालुक्यातील खामसवाडी येथे लांडग्याने हल्ला करून एका शेतकऱ्याच्या शेळीचा फडशा पाडल्याची भीषण घटना घडली आहे. रात्रीच्या काळोखात घडलेल्या या घटनेमुळे गावात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून शेतकरी वर्गात प्रचंड चिंतेचे वातावरण आहे.
खामसवाडी येथील शेतकरी अर्जुन गाढवे यांच्या शेतात मध्यरात्री सुमारास लांडग्याने हल्ला केला. दोन बकऱ्यांना ओढून नेले, तर एक बकरी अर्धवट अवस्थेत मृतावस्थेत शेतात पडलेली दिसली. सकाळी शेतात गेलेल्या गाढवे यांनी हा देखावा पाहताच त्यांचा थरकाप उडाला. परिसरात रक्ताचे डाग, प्राण्याचे ठसे आणि फाटलेली कातडी पाहून गावकऱ्यांमध्ये भीती पसरली.
गेल्या काही दिवसांपासून या भागात रात्रीच्या वेळी बिबट्या आणि लांडग्यांचे हालचाली दिसून येत असल्याने ग्रामस्थांमध्ये आधीच भीतीचे वातावरण होते. मात्र, आता या प्रत्यक्ष हल्ल्याने ती भीती दहापट वाढली आहे.
घटनेची माहिती मिळताच वनरक्षक पी. ए. पांचाळ आणि वन परिमंडळ अधिकारी डी. व्ही. फरताडे यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी पंचनामा करून तपासात लांडग्याचे पायाचे ठसे आढळल्याचे सांगितले. संबंधित शेतकऱ्याला नुकसान भरपाई मिळवून देण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.
या प्रकारानंतर गावकऱ्यांनी वनविभागाकडे अतिरिक्त गस्त वाढविण्याची मागणी केली आहे. खामसवाडी , मंगरूळ परिसरात रात्रीचे काळोख आता भयाचे रूप घेऊ लागले आहे. प्रत्येक शेतकरी सावध आहे, कारण लांडगा पुन्हा केव्हा हल्ला करेल याची धास्ती सर्वांच्या मनात कायम आहे.
=======================================
सौजन्य:
राधा कृष्ण
द वर्ल्ड ऑफ प्युअर व्हेज रेस्टॉरंट
जंत्रे प्लाझा च्या समोर जिजाऊ चौक ढोकी रोड कळंब,
अमित माळी, 9527197374
=======================================
.jpg)
.jpg)

Post a Comment
0 Comments