Type Here to Get Search Results !

लातूरात मटका, गुटखा, दारू आणि अवैध धंद्यांवर पोलिसांचा मोठा प्रहार ! एकाच दिवशी तब्बल 50 लाखांहून अधिकांचा मुद्देमाल जप्त

लातूरात मटका, गुटखा, दारू आणि अवैध धंद्यांवर पोलिसांचा मोठा प्रहार!

 एकाच दिवशी तब्बल 50 लाखांहून अधिकांचा मुद्देमाल जप्त

शिवाजीनगरातील मटका अड्ड्यावर धाड; 11 जण ताब्यात




अभय वार्ता / लातूर


लातूरसह नांदेड परिक्षेत्रात सुरू असलेल्या अवैध व्यवसायविरोधी विशेष मोहिमेत पोलिसांनी धडाकेबाज कारवाई करत गुन्हेगारी विश्वात मोठी खळबळ उडवून दिली आहे. पोलीस उपमहानिरीक्षकांच्या विशेष पथकाने शिवाजीनगर पोलीस ठाणे हद्दीत शिवाजी महाराज चौक ते दयानंद कॉलेज रोड परिसरात सुरू असलेल्या मटका अड्ड्यावर छापा टाकून 11 जणांना रंगेहाथ ताब्यात घेतले.


या कारवाईत रोख रकमेसह तब्बल 2 लाख 57 हजार 450 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून संबंधितांविरोधात जुगार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

दरम्यान, नांदेड परिक्षेत्रात काल दिवसभरात पोलिसांनी अवैध गुटखा विक्रेत्यांवर मोठी कारवाई करत 27 लाख 1 हजार 250 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. तसेच मटका-जुगार प्रकरणात 11 जणांविरोधात 6 गुन्हे दाखल करून 55 हजार 620 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला.


अवैध दारू विक्री करणाऱ्या 16 जणांवर 16 गुन्हे दाखल करण्यात आले असून 27 हजार 620 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. तर अवैध वाळू उपसा करणाऱ्यांवर 2 गुन्हे दाखल करून तब्बल 15 लाख 8 हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला.

गोवंशाची अवैधरित्या वाहतूक करणाऱ्यांवरही 3 गुन्हे दाखल करण्यात आले असून 5 लाख 42 हजार 400 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.


याशिवाय शस्त्र अधिनियम आणि कोटपा कायद्यांतर्गतही विविध कारवाया करण्यात आल्या. एकूण 38 कारवायांमध्ये तब्बल 50 लाख 97 हजार 110 रुपयांचा मुद्देमाल जप्त करून पोलिसांनी अवैध धंदेवाल्यांचे धाबे दणाणून सोडले आहेत.


अवैध व्यवसायांविरोधात नागरिकांनी थेट माहिती द्यावी यासाठी पोलीस उपमहानिरीक्षक कार्यालयाने “खबर” हेल्पलाइन सुरू केली असून 91 50 100 100 या क्रमांकावर फोन किंवा व्हॉट्सअॅपद्वारे माहिती देण्याचे आवाहन पोलीस उपमहानिरीक्षक श्री. शहाजी उमाप यांनी केले आहे.

=======================================












Post a Comment

0 Comments