Type Here to Get Search Results !

जिल्हा परिषद अध्यक्ष उपाध्यक्ष निवडणूक कार्यक्रम जाहीर “या” दिवशी होणार निवड

जिल्हा परिषद अध्यक्ष उपाध्यक्ष निवडणूक कार्यक्रम जाहीर “या” दिवशी होणार निवड



अभय वार्ता वृत्तसेवा/धाराशिव 


जयनारायण दरक 



धाराशिव जिल्हा परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीनंतर सत्तास्थापनेच्या दृष्टीने महत्त्वाची घडामोड घडली असून अध्यक्ष व उपाध्यक्ष पदाची निवडणूक जाहीर करण्यात आली आहे. ही विशेष बैठक शुक्रवार, दिनांक १३ मार्च २०२६ रोजी दुपारी २.०० वाजता जिल्हा परिषद सभागृह, धाराशिव येथे आयोजित करण्यात आली आहे.


धाराशिव जिल्हा परिषद अंतर्गत ही निवडणूक महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम १९६१ तसेच संबंधित नियमांनुसार पार पडणार आहे. बैठकीच्या प्रारंभी अध्यक्ष पदाची निवडणूक घेण्यात येईल आणि त्यानंतर त्याच पद्धतीने उपाध्यक्ष पदासाठी मतदान प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. आवश्यक असल्यास गुप्त मतदानाची प्रक्रिया पार पडेल आणि निकाल त्याच दिवशी जाहीर केला जाणार आहे.


विशेष बाब म्हणजे, शासन निर्णयानुसार यंदाचे अध्यक्ष पद “सर्वसाधारण महिला” प्रवर्गासाठी आरक्षित ठेवण्यात आले आहे. त्यामुळे जिल्हा परिषदेच्या राजकारणात महिला नेतृत्वाला संधी मिळणार असून विविध गटांमध्ये राजकीय हालचालींना वेग आला आहे.


ही संपूर्ण निवडणूक प्रक्रिया जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली पार पडणार असून सर्व संबंधित सदस्यांना वेळेत उपस्थित राहण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.


दरम्यान, जिल्हा परिषदेतील सत्तासमीकरणे काय आकार घेतात, कोणत्या गटाची सत्ता स्थापन होते आणि अध्यक्षपदाची माळ कोणाच्या गळ्यात पडते याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. १३ मार्चची बैठक धाराशिव जिल्ह्याच्या राजकारणासाठी निर्णायक ठरणार आहे.

Post a Comment

0 Comments